Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

इथेच सागरतटी भेटलो...

 

इथेच सागरतटी भेटलो...
दोघे आपण, कधी तरी!
तटात विरते लाट जशी ती....
सरून मीपण, कधी तरी! //ध्रु//

 

इथेच पुळणीवर दोघांनी.....
स्वप्न रेखले हातांनी!
पुन्हा विलगलो....पुन्हा बिलगलो....
दरवेळी नव ओढींनी!!
मला लख्ख ते स्मरते सारे....
स्मरेल तुज पण, कधी तरी!
इथेच सागरतटी भेटलो....
दोघे आपण कधी तरी!! //१//

 

इथेच आहे उभा किनारा....
गाज ऐकतो लाटांची!
लाट, लाट झेपावत आहे....
अजून देखिल स्वप्नांची!!
तीच हवा झुळझुळते आहे....
झुरते तीपण, कधी तरी!
इथेच सागरतटी भेटलो....
दोघे आपण कधी तरी!! //२//

 

अजून दिसतो जळात किल्ला....
देत साक्ष बघ प्रेमाची!
अजून त्याच्या हृदयी धडधड.....
तुझ्या नि माझ्या हृदयांची!
त्याला देखिल अपुली येते....
मधे आठवण, कधी तरी!
इथेच सागरतटी भेटलो....
दोघे आपण, कधी तरी!! //३//

 

असेच आले वळण, तुझा अन्....
हात निसटला अजाणता!
दुनिया माझी धूसर झाली....
तुझ्याविना बघता बघता!!
डोळ्यांमध्ये प्राण आणुनी....
करतो वणवण, कधी तरी!
इथेच सागरतटी भेटलो....
दोघे आपण, कधी तरी!! //४//

 

अजून स्मरतो आणाभाका....
वचने, शपथा त्या सा-या!
गंध नको नुसताच, प्रियेची....
आण खुशाली तू वा-या!!
प्रियेस माझ्या स्मरणांची ही....
पोचव रुणझुण कधी तरी!
इथेच सागरतटी भेटलो....
दोघे आपण, कधी तरी!! //५//

 

इथेच सागरतिरी उभा मी....
जिथून तू गेलीस सखे!
तुझ्या नि माझ्या पाउलवाटा....
अजूनही वाळूत सखे!!
असे वाटते ऐकू यावे....
तुझेच पैंजण, कधी तरी!
इथेच सागरतटी भेटलो....
दोघे आपण, कधी तरी!! //६//

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ