चित्रगुप्त एकदा माझिया, घरीच आला!
सहज आठवण आली म्हणुनी, आलो म्हटला!!
तसा रित्या हातांनी तो आलेला होता......
वही, न पुस्तक, कागद कुठला, हाती होता!
सटरफटर गप्पाही झाल्या करून त्याच्या......
पहात होतो, मीही दडुनी, मुद्रा त्याच्या!
कुणास ठावे, काय त्याचिया मनात होते?
भाव जरा वेगळेच त्याच्या नयनी होते!
कसे तुझे चालले? असे हासुनी म्हणाला!
छान चालले आहे....हसुनी म्हटले त्याला!!
प्रथम वाटले, खरेच तो, सहजी आलेला.....
हळू हळू पण, त्याचा मक्सद, ध्यानी आला!
हळूच त्याने, काढलीच मग, एक डायरी......
अता समजले, कसली होती, ती तैय्यारी!
ध्यानी येता, हेतू त्याचा, गडबडलो मी.......
चपापलो मी क्षणभर, नंतर सावरलो मी!
कळे न आला, धीर कोठुनी, अंगामध्ये?
मीही त्याच्या, बघू लागलो डोळ्यांमध्ये!
वरवर त्याने, बरीच केली, तशी चौकशी!
काय असावे, काम बरे, त्याचे माझ्याशी?
डायरीत तो, काहीबाही, पहात होता......
कुणास ठावे, काय असे तो, शोधत होता?
मायन्यातुनी तपशिलात तो, शिरू लागला......
बारिकसारिक, प्रश्न मला तो पुसू लागला!
मुलखाचा वेंधळाच पण, मी सावध झालो!
रोख पाहुनी प्रश्नांचा मी जागा झालो!!
कुठे, कधी मोजदाद पुण्याची मी करतो?
पापाला पण, प्रयत्नपूर्वक टाळत असतो!
हयातभर मी, हिशेब कसला, लिहिला नव्हता.......
अन् तो माझा सगळा पाढा वाचत होता!
गुंज गुंज पुण्याईचीही नोंद पाहिली!
या डोळ्यांनी नोंदवही त्याचीच चाळली!!
हळूहळू मग, प्रश्नांची सरबत्ती झाली......
उजळणीच मग तमाम आयुष्याची झाली!
प्रेक्षणीय केवढे पहा जाबसाल झाले.......
गेलेले आयुष्यच पुढती उभे राहिले!
हयातभर तू, काय काम, केलेस माणसा?
काय तुझ्या कनवटीस उरले? सांग माणसा!
श्वासाश्वासागणीक जगलो.....मीही म्हटले!
काय वेगळे त्यात जाहले? त्याने म्हटले!!
क्षणाक्षणाला, जिवंत होतो, हे न थोडके!
त्यावर म्हटला, बोल अरे, तू स्पष्ट नेमके!!
मुर्दाडांच्या वस्तीमध्ये एकटाच मी.......
हयात माझी तगवत होतो, एकटाच मी!
इतके कळले की, जगला तू इथे खुबीने.....
सांग कसा तू प्रवास केला? विस्ताराने!
प्रथम पंख, मग पाय छाटले, या लोकांनी......
वाटचाल मग केली सारी बिनपायांनी!
ऐकत होता, शांत अता तो, हसून गाली!
मधेच काही, लिहीत होता, बघुनी खाली!!
कशी जाहली, तुझी नोकरी? मधे म्हणाला......
नोकरीत तू काय साधले? मला म्हणाला!
नोकरीस त्या, कधी नोकरी, म्हटले नाही!
पैसा अन् वेळेची पर्वा केली नाही!!
व्रताप्रमाणे, पेशा मी सांभाळत गेलो......
मुलांस शिकवत गेलो, अन् मी मोठा झालो!
पुरस्कार कोणते, कोणते तुला मिळाले?
कुठल्या पदव्या, कुठले अन् सन्मान मिळाले?
क्षणभर झालो, गप्पगार मी, प्रश्न ऐकुनी......
काय अता बोलावे मी या प्रश्नावरुनी?
दिली कबूली बेधडकपणे, मीही त्याला.......
कोणताच ना पुरस्कार मज, कधी मिळाला!
परंतु खात्रीशीर सांगतो, काय मिळवले.....
विद्यार्थ्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवले!
जगभर माझी, पहा कशी, पोरटी पसरली.....
एकेकाची यशगाथा या कानी पडली!
धन्य जाहलो, पोरांच्या या यशामुळे मी!
हीच कमाई, आजवरी बघ, केलेली मी!!
तशी शेवटी, खुर्ची मोठ्ठी, चालत आली......
न मागताही, जणू प्रसिद्धी धावत आली!
खूप हासला, मग तो ते, ऐकून मनोगत.......
अध्यापन सोडून काय रे केली मिळकत?
जपला का तू एखादा छंदबिंद काही?
ऐकताच हे, खुलली माझी कळी जणू ही!
कविता केली, गझल, शायरी करीत गेलो......
आयुष्याला सोन्याने या मढवत गेलो!
रातंदिन गझलेत असा मी बुडून गेलो......
चहूदिशांना, जणू स्वत:ला, उधळत गेलो!
अता मात्र त्याचीही खुलली कळी अचानक.....
काय शायरी केली, ऐकव म्हटला मुक्तक!
अशी मागणी करता, मी तर सुसाट सुटलो......
धाडधाड मुक्तके, रुबाया बरस बरसलो!
लवून त्याने, वंदन केले, शायरीस त्या......
लिहून मग घेतलीच ती डायरीमधे त्या!
किती वेळ त्याची माझी मैफील चालली......
रात्र सराया आली, शीतल पहाट झाली!
अखेर तो म्हटला की, काही नोंदी हुकल्या.......
त्या भरण्या मी आलो होतो, तुला भेटण्या!
निवृत्तीचा विषाद मानू नकोस मित्रा!
कर तू स्वप्ने उरलेली साकारच मित्रा!!
खूप लांबचा पल्ला आहे तुला जायचा........
प्रवास सुखकर पुढील सुद्धा तुझा व्हायचा!
पाठीवरती, थाप मारुनी, निघून गेला......
बघता बघता, चित्रगुप्त तो गायब झाला!
कानावरती, हाक बायकोची मग पडली....
उठा, किती झोपता, पहा हो, सकाळ झाली!
तेव्हा कळले, स्वप्नच होते एक पाहिले!
जणू स्वत: विधिलेख स्वत:चे त्यात पाहिले!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY