जगा तुला मी वाचले कुठे?
मला तरी मी चाळले कुठे?
अजूनही मी पाहुणा मला.....
अजून नाते जोडले कुठे?
किती जरी मी पाश तोडले.....
तुझ्यासवे मन जोडले कुठे?
कुठे कळालो या जगास मी?
कुठे तराजू? तोलले कुठे?
म्हणून मीही ओठ टाचले.....
कधी जगाने ऐकले कुठे?
नवे कितीही पाड तू तडे.....
जुने तडे मी सांधले कुठे?
निवडणुका जाहल्या ख-या......
जुनेच सारे....बदलले कुठे?
अजूनही मी वाट पाहतो.......
वचन तुझे तू पाळले कुठे?
कुठे कुठे मी हिंडहिंडलो......
स्मरे न काळिज ठेवले कुठे?
पुन्हा पुन्हा मी भेटतो तुला.....
तटा! मला तू टाळले कुठे?
घरोघरी मी राहतो अता!
स्वत:स मी घर बांधले कुठे?
दशा कळ्यांची पाहुनी अशी.....
पुन्हा बगीचे बहरले कुठे?
असे करावे जीवना रफू.....
कळायचे ना फाटले कुठे?
जरी मिळाली वाहवा तुला;
अजूनही ते झिंगले कुठे?
हरेक मिसरा आर्त केवढा!
तरी मनोगत पोचले कुठे?
किती तुला पाहिले तरी;
असेच वाटे....पाहिले कुठे?
किती सडे तू शिंपशी नवे!
जुने सडे मी वेचले कुठे?
त-हेत-हेचे लाभले दगे....
तरी हृदय हे भंगले कुठे?
अजूनही मी वाट पाहतो!
किती युगे ते मोजले कुठे?
तशीच स्वप्ने राहिली कशी?
मला चिते! तू जाळले कुठे?
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY