जगाला हात देताना स्वत:ला फार सांभाळा!
बरा ना विस्तवासंगे असा खेळायचा चाळा!!
अशा चिंतेमधे मी हाकला गाडा प्रपंचाचा.....
कसा मी निस्तरावा हा प्रपंचातील घोटाळा?
घरी दारिद्र्य अठराविश्व! होते काय चोराया?
कडी ना लावली साधी, कशाचा लावतो टाळा!
रिचवले सर्व रंगांच्या विषाचे आजवर प्याले!
उन्हाने रापुनी नुसता, न झाला रंग हा काळा!!
जरी ज्वालाग्रही होतो, जरी ज्वालामुखी होतो....
कधी मी पेटलो नाही....कधी ना फेकल्या ज्वाळा!
चुका होतात पण त्यातून शिकणे हे महत्वाचे!
निसरडी वाट दिसली की, कटाक्षानेच ती टाळा!!
स्मृती आहेत त्या, येणार वारंवार माघारी....
भले त्यांना पुरा किंवा भले त्यांना किती जाळा!
अरे, तो प्राण गेलेला, कधी फिरकेल का मागे?
कितीही ऊर बडवा वा, कितीही आसवे ढाळा!
कशाला मान कोणाच्या अशी हातामधे द्यावी?
कुणाशी बोलताना आपली गुपिते तरी गाळा!
किती मिळवूनही पदव्या, निरक्षर राहिला अंती!
कधी ना पाहिली त्याने ख-या जगण्यातली शाळा!!
कुणाचाही असो, तो जीव म्हटले की, महत्वाचा!
कितीही धांदलीमध्ये सुरक्षेचे नियम पाळा!!
जरी ना द्यायला जमले, प्रियेला चंद्र वा तारे;
गुलाबाची फुले काही तिच्या गज-यामधे माळा!
किती हे चालले तांडव चहूबाजूस मृत्यूचे!
कसा माणूस धरणीचा ठिगळ लावेल आभाळा?
शहाण्याला पुरेसा मार शब्दांचा...खरे आहे!
असे हेही खरे की, पाहिजे काठीच नाठाळा!!
न मी दैनंदिनी लिहिली, न ताळेबंद जगण्याचा!
अता वार्धक्य हे माझे पहाते घ्यायला ताळा!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY