जाहली खूप संभाषणे!
राहिले नेमके बोलणे!!
गोठवी पाहता पाहता....
काय सांगू तिचे पाहणे!
येउनी तीच गेली कळे....
सांडले चौकडे चांदणे!
रोज माझे वजन वेगळे....
काय दुनिये तुझे तोलणे!
वाट दमली...पहा थांबली!
मात्र माझे सुरू चालणे!!
वळचणीला सुखे राहती....
ना कधी बोलणे चालणे!
शर्यतीसारखी जिंदगी.....
जीव खाऊन हे धावणे!
ती खळी वेड लावी जीवा!
जीवघेणे तिचे हासणे!!
रोज घायाळ करते मला.....
ते तिचे लाघवी लाजणे!
काय नाजुक तिचे विंधणे!
बाण नजरेतुनी सोडणे!!
सात जन्मातले पुण्य हे.....
नाव माझे-तुझे जोडणे!
धूर ना, जाळ ना, राख ना......
जिंदगीचे अजब जाळणे!
दे शलाका कृपेची तुझ्या......
हेच एकूलते मागणे!
का न व्हावी अनावर फुले?
काय नाजुक फुले तोडणे!
कैफ गझले तुझा और हा......
और माझे-तुझे झिंगणे!
और हा सोस आहे तुझा....
विस्तवाशी असे खेळणे!
हुंदका ना उसासा कधी.....
हे जगावेगळे सोसणे!
मौन लागे जिव्हारी तुझे!
जीवघेणे तुझे टाळणे!!
काय हलका असे हात हा.....
काय अलवार हे गोंदणे!
गूज माझे तुझ्या लोचनी....
पाहतो मी तुझे वाचणे!
लाट उध्वस्त होते तटी.....
हे कसे और आलंगणे?
हा किनारा कसा कोरडा?
और त्याचे जळी डुंबणे!
संकटांतून संधी मिळे......
और देवा तुझे धाडणे!
रोज सुचवी गझल छानसी.....
हे तुझे गोड झंकारणे!
लेखणीतून तू पाझरे......
हे तुझे आर्द्र पान्हावणे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY