जमते सहज तितके तरी जमवून घ्यावे!
दुनियेसवे तू शक्यतो जुळवून घ्यावे!!
हे लोक हटवादी, नको आटापिटा हा....
जात्याच त्यांचा पिंड हा, समजून घ्यावे!
चर्चा हवी निर्मळ, नको हेवे नि दावे....
पटवूनही द्यावे तसे पटवून घ्यावे!
असतात करण्याजोगती कित्येक कामे.....
एकेक करूनी काम ते उरकून घ्यावे!
हृदय म्हणजे आरसा असतो मनाचा....
प्रतिबिंब एकांतामधे निरखून घ्यावे!
विसरून जाते, पळत सुटते चौकडे ते....
चंचल मनाकडुनी पुन्हा वदवून घ्यावे!
खळखळ अती ते लागते जेव्हा कराया....
तू श्रांतलेले मन जरा उचलून घ्यावे!
चव प्रत्ययांची समजते अन् भावतेही....
पेल्यास हृदयाच्या सतत विसळून घ्यावे!
------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY