जन्मलो मी जिथे, ते नगर कुठे?
राहत्या माणसांचे शहर कुठे?
ढगफुटी जाहली केवढी इथे....
पायथा पाहतो की, शिखर कुठे!
काटला जन्म वा-यावरी असा....
राहतो मी कुठे आणि घर कुठे!
माणसे वाटती दूर दूर का?
स्नेहबंधातला तो पदर कुठे?
काल निवृत्त झालो अखेर मी...
तास ना, टोल ना, तो गजर कुठे?
जडजवाहर धुळीनेच माखले....
राहिली जोहरी ती नजर कुठे?
शोधतो मी कधीचा मला इथे....
मी कुठे आणि माझा बहर कुठे
गलबताला किनारा पुसे कसा....
सांग होतास तू आजवर कुठे?
आज निष्पर्ण मी...हेच विसरलो...
भान ना आपला तो डवर कुठे!
तूच केलेस घर माझिया उरी....
राहिले अंतरंगी विखर कुठे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY