जप कशाचा, माळ खुंटीलाच टांगत भक्त होते!
वेष भक्तांचा, मनाने मात्र ते आसक्त होते!!
मी कशाला सांग सांडू, आटवू हे रक्त माझे?
एवढे थोडेच वेड्या स्वस्त माझे रक्त होते!
प्रेम, आदर आणि निष्ठा बोलण्याच्या या न गोष्टी....
हालचालीतून तुमच्या सर्व काही व्यक्त होते!
का सडा पडणार गझलांचा न माझ्या भोवताली?
अंतरंगी डवरलेले माझिया प्राजक्त होते!
खूपदा स्वप्नात सखये येउनी गेलो तुझ्या मी....
पण, तिथेही भोवती तुझिया पहारे सक्त होते!
ना कुणी हेलावले ना ढाळले अश्रू कुणी.....
सोडला मी प्राण तेव्हा गगन हे आरक्त होते!
शेवटाचा श्वास सरणानेच घेताना कुणीही.....
सोयरे नव्हते उपस्थित, यार माझे फक्त होते!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY