जीभ नाही, एक ही म्यानातली तलवार आहे!
सभ्यतेने वाग, माझ्या सभ्यतेला धार आहे!!
कोण जाणे, कोण नेतो चोरुनी सारीच किरणे?
सूर्य आकाशात आहे, अन् इथे अंधार आहे!
काय डोळे झाकुनी त्यांनी मते होती दिली ती?
शहर आहे डोळसांचे, आंधळा दरबार आहे!
काय ही संसद असे की, एक कुस्तीचा अखाडा?
आरडाओरड किती ही, काय हाहाकार आहे!
हिकमतीने अन् शिताफीने पहा निवडून आले.....
ठेवला त्यांनीच त्यांचा चौकडे सत्कार आहे!
काय माझ्या कनवटीला? कोणते स्थावर नि जंगम?
मी सडा आहे अरे, माझे कुठे घरदार आहे?
वेड घेवोनीच जाती पेडगावी नेहमी ते.....
हा हवेमधलाच त्यांचा एक गोळीबार आहे!
घोषणा पोकळ, नि हाकाट्या नि डांगोराच नुसता.....
फक्त स्वप्नांचाच त्यांनी मांडला बाजार आहे!
आज बाजारात चालू लागली नकलीच नाणी.....
ऐट नाण्याची अशी की, ते जणू कलदार आहे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY