जीत अता खेचूनच आणू...हरणे नाही!
घोडदौड करताना मागे फिरणे नाही!!
खुशाल माझ्या देहाचाही त्याग भले कर.....
तुझा परंतू, विक्रय आत्म्या, करणे नाही!
नामस्मरणानेच तुझ्या शमवीन चित्त हे.......
उगाच वणवण, भरकटणे, भिरभिरणे नाही!
कशास माझा वसंत वाया उगा घालवू?
पानगळीच्या आठवणींनी झुरणे नाही!
म्हणून जातो दिवस सुखाचा....प्रसन्नतेचा.....
अजून मी सोडले सकाळी फिरणे नाही!
रोज स्वत:ला बजावतो मी उठल्या उठल्या......
उगाच भलता शोक कशाचा करणे नाही!
निवृत्तीच्या रजेवरी मी गेलो आहे.......
अता सकाळी पटापटा आवरणे नाही!
का न मनाला प्रसन्नता या मिळायची रे?
मनाविरोधी आता काही करणे नाही!
वरवरती वाचतात सारे गझला माझ्या......
कुणी पाहिले हृदयाचे पाझरणे नाही!
दूर वासरे गेली.....दावण एकटीच ही!
गोठ्यामध्ये दिसायचे हंबरणे नाही!!
वरवरची वाहवाच नुसती कुचकामी ही.......
कुठे शायरीचे मज दिसते मुरणे नाही!
असा एवढा बदल कशाने तुझ्यात झाला?
हल्ली हल्ली पूर्वीचे कुरबुरणे नाही!
दुनिया ही पाषाणांची झालेली आहे.........
अता काळजाचे कोठेही विरणे नाही!
स्वार्थाचे आंदोलन दिसते चहू दिशांना.........
अनुष्ठान, उपवास, जगास्तव, धरणे नाही!
सत्संगाचे नाव फक्त पण, धंदे दुसरे........
प्रवचनेच झोडती परी, आचरणे नाही!
अता बोलती.....इतक्या कोटींचा घोटाळा......
इतकी वर्षे, कुणास दिसले चरणे नाही!
असा मुख्यमंत्र्याचा दौरा प्रथम पाहिला........
पायघड्यांचे कोठेही अंथरणे नाही!
अंतर्जालावरील वर्दळ दुरून बघतो.........
सच्च्या गझलांचे तेथे वावरणे नाही!
कसे शेत गझलांचे त्यांच्या बहरावे रे?
अजून त्यांचे पाहिलेच नांगरणे नाही!
इतका थकतो की, पडल्या पडल्या मी निजतो!
कधी नीट अंथरणे वा पांघरणे नाही!!
काय तुझ्या नजरेची जादू, मलाच माझे.....
अजून कळले गांगरणे, बावरणे नाही!
जन्मभरी केल्यावर डोकेफोड, ठरवतो.......
रक्ताचे पाणी केव्हाही करणे नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY