जिंदगीभर देत गेलो, ही सजा त्याचीच होती!
कनवटीला फक्त माझ्या राखरांगोळीच होती!!
का म्हणू की, सोबती सारे मला सोडून गेले....
सोडुनी गेली प्रथम ती सावली माझीच होती!
हिंडलो दाही दिशांना शोधण्यासाठी सुखे जी....
ती सुखे सारी मिळाली माझियापाशीच होती!
वाटले की, दूरचे असतील हल्लेखोर कोणी....
माणसे दुसरी न कोणी, चक्क शेजारीच होती!
पापण्यांपाशीच स्वप्ने येउनी खोळंबलेली.....
रात्रभर निद्राच माझी लोचनी जागीच होती!
काय विधिलेखात होते, वाचता आलेच नाही....
या कपाळावर करंटी केवढी आठीच होती!
तूच पाझरतेस माझ्या लेखणीमधुनी अताशा....
जाहली हरएक माझी गझल सोनेरीच होती!
तीन दशके लिहित आहे मी गझल डोळसपणाने.....
त्यातली सच्ची गझल पण फक्त एखादीच होती!
बेरजेचे आणि माझे वैर जन्माचेच झाले.....
माझिया वाट्यास आली रे, वजाबाकीच होती!
खूप केला योग, जपली माळ, प्राणायाम केला....
मात्र ही शांती मनाची हाय, हंगामीच होती!
श्वास टाकायास माझे प्रेत थोडे थांबलेले.....
तेवढ्यामध्येच तिरडी बांधुनी झालीच होती!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY