जिंदगीने हा दिला मज शाप आहे!
सौख्य थोडे, दु:ख वारेमाप आहे!!
कोठुनी येतात ओठी दिव्य ओळी?
रोज देवाशीच वार्तालाप आहे!
जिंकली मैफील तानेनेच पहिल्या....
मारव्याचा एक मी आलाप आहे!
घोडदौडीची दिशा कुठली कळेना....
फक्त ऐकायास येते टाप आहे!
समजले त्यांना उशीरा, पण समजले....
मी गझल अन् शायरीचा बाप आहे!
व्यक्त करण्या राग फुटकळ शेर लिहिती....
केवढा सात्वीक तो संताप आहे!
लागले मोजायला लांबी नि रुंदी....
माझियाजोगे कुठे पण माप आहे?
घ्या कुणीही कोणतीही 'जमिन' माझी....
झाकण्याजोगी न माझी छाप आहे!
काय ही आवड म्हणावी शायरीची....
शायरीचा त्यास चढतो ताप आहे!
माझिया गझलेत येते झाक त्याची....
दिव्यतेची चाखली मी खाप आहे!
मी अताशा जात नाही मैफिलींना.....
वाटते की, भोवताली साप आहे!
केवढे कुंथून ते लिहितात गझला....
शेर कसले, शायरीची धाप आहे!
तू न ओळखलेस की, मी कोण आहे.....
शायरीच्या बंदुकीचा चाप आहे!
डौल, ठेका, लय कशी गझलेत येते?
मी मृदंगाची उराच्या थाप आहे!
पुण्य तू म्हणशील तर ते फार नाही.....
टाळले प्रत्येक पण मी पाप आहे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY