काल होती शांतता निश्चल इथे!
चालला आहे कशाचा खल इथे?
कोकिळेची कूजने विरली पहा....
कावळ्यांचा काय कोलाहल इथे!
तू न डोकेफोड केलेली बरी!
मूढतेचा केवढा अंमल इथे!!
रोज होते वाढ थोडी झीजही;
मी हिमालय! मीच विंध्याचल इथे!
गझलहौशी कैक, शिकणारे किती?
फार थोड्यांचाच आहे कल इथे!
कायदे अन् कागदी आरक्षणे......
आजही दलितांत आहे सल इथे!
दे मला तुझिया स्मृतींची शाल तू.....
विरहवारा केवढा शीतल इथे!
याच वळणावर सुटावे व्यसन हे......
पाहिजे थोडेच इच्छाबळ इथे!
माउलींच्या पालखीसाठी चला......
काळजाची अंथरू मखमल इथे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY