कळेना का असा बघतो मला तो एकटक तारा....
कुणासाठी करत आहे इशा-यानेच हाकारा?
असे का वाटते आहे, मला जग टाळते आहे....
कुणा लागू दिला नाही, कधी मी वाहता वारा!
कसे आकाश हे झाले असे पाषाण हृदयाचे.....
धरेच्या लोचनांमधल्या दिसत नाहीत का धारा?
नको ते लोक ओलांडून रांगा लागले येऊ....
पहा तो देवही गेला अता सोडून गाभारा!
नको लावूस तू माझ्या असे वाटेकडे डोळे....
अरे, मी काळ गेलेला कसा येईन माघारा?
स्वत: तो चूड लावाया अजीजीने पुढे आला...
दयाळू केवढा झाला अचानक एक हत्त्यारा!
कळेना कोणती जादू अकस्मिक जाहली येथे....
टवाळांनी कसा केला मला पाहून पोबारा!
कसा ओठांवरी अलगद उतरला दिव्य हा मतला....
कळेना कोण हृदयाच्या अशा या छेडते तारा!
मनाने मी तरुण आहे, तरी स्वीकारतो हेही....
तनू ही कुरबुरे आता, खरच झालोय म्हातारा!
मला महसूस कर, धावू नको वेचायला मजला....
कसा येईल तो चिमटीत जो साक्षात रे, पारा!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY