काळजाची माझिया ही एकतारी....
दु:खितांची गात आहे रागदारी!
गझल नाही, स्तोत्र लिहितो शारदेचे.....
शारदेचा एक मी आहे पुजारी!
शब्दरूपी मागतो माधोकरी मी.....
होय, मी आहेच शब्दांचा भिकारी!
शब्दसंपत्ती नव्हे माझी स्वत:ची....
ही जगाने दान केलेली हुशारी!
पंखही शाबूत अन् नभ मोकळे हे....
वाटते साठीतही घ्यावी भरारी!
कैकवेळा तोंडचाही घास गेला....
कमर कसुनी खेळतो आहे जुगारी!
माणसे थोडी, पशू जास्ती अढळले.....
हिंडलो काश्मीर ते कन्याकुमारी!
सवय झाली या टवाळांची अशी की,
येइना झाली टुकारांची शिसारी!
माणसे बहुतेक होती टाळणारी....
पाहिली मी माणसे कवटाळणारी!
मी गळ्यामध्ये कुणाच्याही न पडलो...
जाहली दु:खे, कधी सौख्ये फरारी!
पैलतीराचे कितीसे शेष अंतर?
मी अता करतो निघायाची तयारी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY