काय त्यांच्या आत काही हालले का?
वारलो मी, आणि ते ओशाळले का?
राखरांगोळीत वेड्यासारखा मी....
शोधतो की, स्वप्न कुठले वाचले का!
झुळुक होती की, तुझी चाहूल होती?
हृदय हे पळभर असे झंकारले का?
गुणगुणाया लागले ते एकट्याने.....
काय माझे शेर त्यांना भावले का?
एकमेकांचे इशारे पाहिले मी......
कोण जाणे, पाहुनी मज हासले का?
हारजीतीचा न काथ्याकूट केला....
ना तमा मज, हारले का, जिंकले का!
श्वास होते मंद, निपचित देह निजले....
कैकजण पाहून गेले, वारले का!
धसमुसळ त्यांचीच आहे धसकट्यांची.....
हेंगडे म्हणतात वरती फाटले का?
श्वास घेतानाच सरली जिंदगानी.....
जिंदगीभर श्वास नुसते घेतले का?
भूक केव्हाची बिचारी थांबलेली....
पाहते ताटात काही वाढले का?
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY