केस ते झटकून होते मोकळी तू!
जीव घायाळून होते मोकळी तू!!
मारवा झंकारतो या काळजाचा.....
तार ती छेडून होते मोकळी तू!
सोसतो अंधार तू गेलीस की, मी.....
लोचने दिपवून होते मोकळी तू!
रेशमाचे पाश साखळदंड होती....
बघ, मला जखडून होते मोकळी तू!
पळभराची भेट....जन्माचा दुरावा!
प्राणही उसवून होते मोकळी तू!!
कैक कोडी घालशी नजरेत एका....
उत्तरे दडवून होते मोकळी तू!
कैक हृदयांची फुले वाटेत तुझिया....
पदतळी चिरडून होते मोकळी तू!
वळचणीला थांबलो तुझिया जरासा....
केवढी भिजवून होते मोकळी तू!
मदिर डोळे, अन् खळ्या, कमनीय बांधा....
लोचने खिळवून होते मोकळी तू!
नागमोडी चाल, नखरा जीवघेणा!
अंतरी रुतवून होते मोकळी तू!!
ऐन दिवसाची कशी पडतात स्वप्ने?
झांपडा लाऊन होते मोकळी तू!
चित्त हातोहात तू चोरून नेते!
झोपही उडवून होते मोकळी तू!!
काय मंतरणे कटाक्षांनीच नुसत्या....
जीव नादावून होते मोकळी तू!
चक्रवातासारख्या सा-या स्मृतींनी;
मस्त चक्रावून होते मोकळी तू!
भरसभेमध्ये न घाबरता कुणाला....
काय मज खुणवून होते मोकळी तू!
लावते चाळा मलाही पाहण्याचा....
ही मती चळवून होते मोकळी तू!
दूर तू जाताच कळवळतो किती मी!
पळभरी बिलगून होते मोकळी तू!!
ही नजर की, एक गोफण लोचनांची?
लांब भिरकावून होते मोकळी तू!
तळपती तलवार वा वाटे सुरी तू!
सहज बिचकावून होते मोकळी तू!!
एवढे सौंदर्य वर, शृंगारही हा....
चित्त भंडावून होते मोकळी तू!
केवढ्या रुतती तुझ्या त्या भावमुद्रा!
अंतरी कोरून होते मोकळी तू!!
केवढ्या सहजी नजर चुकवून माझी.....
मज उरी कवळून होते मोकळी तू!
आरशाचीही नजर टाळून मधुनी....
कैकदा मुरकून होते मोकळी तू!
रेशमी ते केस विंचरतेस हलके.....
अन् मला गुंतून होते मोकळी तू!
नजरभेटीची मिठी ती घट्ट असुनी;
लीलया निसटून होते मोकळी तू!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY