खेचण्या यश मानसिक बळ पाहिजे!
आणि हाती योग्य ती कळ पाहिजे!!
राहते तारुण्य वार्धक्यातही....
अंतरंगी फक्त हिरवळ पाहिजे!
फूल कुठले सांग अत्तर लावते?
काळजामध्येच दरवळ पाहिजे!
पोचते हृदयातुनी हृदयी गझल.....
शायराचा भाव निर्मळ पाहिजे!
देवही द्रवतो, अखेरी पावतो!
पोचली पण, आर्त हळहळ पाहिजे!!
जागृती येतेच निजलेल्या जगा....
त्याचसाठी एक चळवळ पाहिजे!
कर कुठे म्हटले कृपावर्षाव रे?
ईश्वरा मज एक ओंजळ पाहिजे!
पकडता चिमटीमधे येते गझल....
काळजाचा पाहिला तळ पाहिजे!
वेदनांवर शेर तू ऐसा लिही....
काळजावर उमटला वळ पाहिजे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY