Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

खुद्द नभाची ही मर्जी जर, हरकत नाही!

 

खुद्द नभाची ही मर्जी जर, हरकत नाही!
नकोस देऊ पंख हवे तर, हरकत नाही!!

 

खोटा खोटा तरी दिलासा दे मजला तू......
बोल भले माझ्याशी वरवर, हरकत नाही!

 

फुटेल तेव्हा फुटेल पाषाणाला पाझर.....
तोवर करतो मीही मरमर, हरकत नाही!

 

थांब जरासा....आटपतो मी जगणे माझे!
नंतर ये तू, मृत्यू भरभर, हरकत नाही!!

 

सुचेल तेव्हा सुचेल, काही चिंता नाही......
कविता माझी येते झरझर, हरकत नाही!

 

काय असे कामाची वेड्या, घिसाडघाई?
मधे मधे तू थांब घडीभर, हरकत नाही!

 

तुझा भासही पुरे माझिया तृष्णेसाठी......
मृगजळही प्राशेन जन्मभर, हरकत नाही!

 

तू दमतो की, मी, बघू कर वार जगा तू......
हळू हळू मी बनेन कणखर, हरकत नाही!

 

कुठे मागतो आरसपानी महाल सखये?
हृदयी दे मज जागा टिचभर, हरकत नाही!

 

तुझ्या सोबतीचे दे सोने आधी कणभर.....
मग तू दे मज दु:खे मणभर, हरकत नाही!

 

हे न थोडके, ऐलतीर मी, पैल तिरी तू!
असो कितीही मधले अंतर, हरकत नाही!!

 

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ