Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

माझे न काही, जे काय आहे, ते सर्व आहे परमेश्वराचे!

 

 

माझे न काही, जे काय आहे, ते सर्व आहे परमेश्वराचे!
माझी न काया, माझी न छाया, श्वासांवरीही स्वामित्व त्याचे!

 

जन्मास आल्यापासून माझ्या वाट्यास आली झोळी रिकामी;
आली न विद्या, आली न लक्ष्मी, आयुष्य जगलो भिक्षेक-याचे!

 

गुंडाळतो मी जितका पसारा, तितका नव्याने होतो पसारा!
नाही मलाही, आता कुठेही, कोणामधेही गुंतावयाचे!!

 

केला जिवाचा आटापिटा मी! बाहेर येण्या कर्जातुनी मी,
मुद्दल निरळे, मी व्याज देखिल फेडू न शकलो देणेक-याचे!

 

जे वार झाले, ते पाठमोरे! मी वाचलो...ही किमयाच आहे!
अद्याप ओझरते तोंड देखिल मी पाहिले ना मारेक-याचे!!

 

माझ्यासवे तू आहेस देवा, इतकी विनवणी माझी तुला की,
होकारण्या दे बुद्धी विवेकी, धारिष्टही दे नाकारण्याचे!

 

मी दूर इतका चालून आलो, ते फक्त माझ्या स्वप्नामुळे मी;
राहून गेले सत्यात अंती ते स्वप्न माझे साकारण्याचे!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ