माणसांची नस नि नस माहीत होती!
ती दिसायालाच संभावीत होती!!
काय उरलेले चिते, जाळावयाला?
वेदना मज जन्मभर जाळीत होती!
वेंधळा मी नेमका नसतोच जागी....
एक संधी मज सदा शोधीत होती!
काय ती औदार्यबुद्धी माणसांची....
मज खिरापत समजुनी वाटीत होती!
शायरी माझी न पेलवलीच त्यांना....
का मला संमेलने टाळीत होती?
शेवटी काटेच माझे यार झाले....
मज फुले सारीच नाकारीत होती!
हाक माझी ऐकली नाही कुणीही....
वाहती गर्दी सदा घाईत होती!
बाटली होती उभी, माणूस अडवा....
माणसाला चक्क दारू पीत होती!
मी बदललो पण, मला ठाऊक नव्हते....
नजर देवाचीच न्याहाळीत होती!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY