मंद, कोणाला जलद तो वाटतो!
काळ काळाच्या गतीने चालतो!!
जायचे, ना जायचे ते, तू ठरव.....
काळ कोणास्तव कधी का थांबतो?
कात, तंबाखू, सुपारी, अन् चुना....
सर्व असले की, विडा मग रंगतो!
कैफ गझलेचा अहोरात्री असा.....
वाटते दारू पितो अन् झिंगतो!
का न ओठांवर गझल या यायची?
मी अरे, गझलेमधे तर डुंबतो!
पाहतो जेथे कुठे दिव्यत्व मी.....
जोडुनी मी हात त्याला वंदतो!
फक्त आहे दर्शनी मी शांतसा.....
आत माझ्याशीच मी तर झुंजतो!
लोक नादातच फुलांच्या धावती....
मात्र मी काटेच वेचत थांबतो!
कोंडवाडे वाटती डोळेच हे!
रोज अश्रूंची गुरे मी डांबतो!!
मी कुठे प्यालो अरे दारू कधी?
का मला येतो नि जो तो हुंगतो?
हे तुला कळणारही नाही कधी......
मी मनातच माझिया आक्रंदतो!
जिंदगी! आहे खिलाडू एक मी!
हार होवो, जीत होवो....खेळतो!!
तू उधळ नियती भलेही कैकदा....
मी नव्याने डाव माझा मांडतो!
शायरी इतकी शिगोशिग अंतरी....
की, जिथे जातो तिथे ती सांडतो!
हो! भिडस्तासारखा आहेच मी!
ना म्हणायाला सतत संकोचतो!!
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY