माणसांस पहिल्यांदा चाचपून बघतो मी!
काळजात मग त्यांच्या अवतरून बघतो मी!!
मीच अडथळा झालो माझिया जिण्यामधला...
ढगळ जाहलो आहे, आक्रसून बघतो मी!
झोप येउनी सुद्धा राहतात जाग्या त्या....
वेदनांस निजवाया जोजवून बघतो मी!
धर्म झुळझुळायाचा फक्त पाळतो आहे....
लोक काळजाचे कातळ, पाझरून बघतो मी!
आजही तशी आहे, काल ती जशी होती....
जिंदगी पसा-याची, आवरून बघतो मी!
ठेचकाळलो इतका की, अता नको धोका....
दु:ख वा असो सुख ते, पारखून बघतो मी!
संपले तरुणपण, पण धुंद आजही आहे.....
टेकताच साठीला ओसरून बघतो मी!
वाट नागमोडी ही, अन् अनोळखी सुद्धा....
मी मलाच म्हणतो की, वावरून बघतो मी!
एकही जुनी वस्तू टाकता न मज आली....
रोज रोज एखादी वापरून बघतो मी!
ओळ ओळ सोन्याची जाहली उगा नाही....
शब्द शब्द हा माझा पालखून बघतो मी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY