मरणही म्हणाले किती भोगशी तू? सजा भोगण्याचा कडेलोट झाला!
तुला आज मी मुक्त करणार आहे, तुझ्या सोसण्याचा कडेलोट झाला!!
कितीदा अशी राख झालो कळेना,कितीदा फिरोनी उभाच्या उभा मी!
विजांशी कुणी एवढे खेळते का? विजा झेलण्याचा कडेलोट झाला!!
जगाचाच आजन्म संसार केला, न पत्नी, न मुलगा, न मुलगी बघितले!
सडाच्या सडा राहिलो शेवटी मी, सडा राहण्याचा कडेलोट झाला!
जगावेगळा सोस त्याला फुलांचा, घराचा जणू जाहलेला बगीचा!
घरी कोपराही न उरला रहाया, फुले वेचण्याचा कडेलोट झाला!!
दिले सोडुनी दर्पणी पाहणे मी, मलाही न मी ओळखायास येतो!
चरे पाडले केवढे या जगाने, चरे पाडण्याचा कडेलोट झाला!!
तुझे हासणे, लाजणे जीवघेणे! तुझे पाहणेही नशा आणणारे!
खळ्या हास-या पाहुनी वाटते की, तुझ्या हासण्याचा कडेलोट झाला!!
न हे पायही राहिले सोबतीला, तरी चालतो वाट अद्यापही मी.....
कधी गाव येणार माहीत नाही, पहा चालण्याचा कडेलोट झाला!
अहोरात्र गझलेत तू डुंबलेला! अहोरात्र गझलेत तू धुंदलेला!
न खाण्यापिण्याची तुला शुद्ध वेड्या, तुझ्या झिंगण्याचा कडेलोट झाला!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY