मेघ दाटू लागले....
खिन्न वाटू लागले!
मी तरी टाचू किती?
व्योम फाटू लागले!
हे तुझ्यासाठी पुन्हा....
रक्त आटू लागले!
मज पतंगासारखे....
लोक काटू लागले!
व्यंगचित्रासम मला....
ते फराटू लागले!
मी खिरापत जाहलो!
लोक वाटू लागले!!
का असा घाटीव मी?
लोक घाटू लागले!
हाय ठेल्यासम मला.....
लोक थाटू लागले!
फायद्यासाठीच ते .....
पाय चाटू लागले!
फायदा सरताच ते....
लोक हाटू लागले!
लागला धस कैकदा....
स्वप्न फाटू लागले!
कलम करण्या ते मला.....
रोज छाटू लागले!
जीवनी येताच तू.....
ते विराटू लागले!
हे प्रदूषण केवढे......
लोक बाटू लागले!
प्रहर कुठलाही असो.....
ते तराटू लागले!
मी सडासा अन् खुला!
लोक लाटू लागले!!
दु:ख इतके भोगले....
मन उचाटू लागले!
वाट पाहोनी तुझी,
मन उताटू लागले!
दर्शनासाठी तुझ्या....
मन पिसाटू लगले!
फुकट जेवण पाहुनी....
ते खमाटू लागले!
ऐन बहराचे तरू....
का खराटू लागले?
झाड प्रीतीचे असे.....
का खुराटू लागले?
भान प्रेताचे कुणा?
ते चकाटू लागले!
वेड गझलेचे मला!
बघ झपाटू लागले!!
आतडे तुझियाविना.....
बघ तटाटू लागले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY