मी फराट्यासमान का वाटे?
व्यंगचित्रासमान का वाटे?
मी असा जन्मजात रंगाने......
रंग गेल्यासमान का वाटे?
श्वास चालूच...कूसही बदले!
प्राण गेल्यासमान का वाटे?
नजर शून्यामधे तिची असते.....
नजर खिळल्यासमान का वाटे?
रंग आहे...सुगंधही आहे!
फूल सुकल्यासमान का वाटे?
एकही ना तडा, चरा गेला.....
आत तुटल्यासमान का वाटे?
का तुला याद मी पुन्हा आलो?
श्वास अडल्यासमान का वाटे?
रक्त पाण्यासमान का वाटे?
प्रेम अटल्यासमान का वाटे?
वय जरी साठ, हा कणा ताठच....
आज झुकल्यासमान का वाटे?
सूर्य गेला जरा ढगांमध्ये.....
सूर्यग्रहणासमान का वाटे?
या हवेला दिले कुणी पैंजण?
तूच आल्यासमान का वाटे?
माळते ती मलाच आताशा.....
मीच गज-यासमान का वाटे?
काय कल्लोळ शांततेचा हा!
घर स्मशानासमान का वाटे?
आज शहरातल्या नद्या बघुनी.....
सांडपाण्यासमान का वाटे?
शायरीला मधापरी गोडी.....
तूच झरल्यासमान का वाटे?
काय ही आठवण तुझी घरभर.....
सदन भरल्यासमान का वाटे?
तूच माझे प्रिये, तलम अस्तर....
आज विरल्यासमान का वाटे?
नेहमीचा तुझा अबोला पण......
आज रुसल्यासमान का वाटे?
तूच जिंकू दिलेस का मजला?
जीत हरल्यासमान का वाटे?
झाकशी दु:ख तू असे कुठले?
हास्य रडल्यासमान का वाटे?
कोणती वेदना जिवा खाते?
दोस्त कुढल्यासमान का वाटे?
माणसे जाहली विकाऊ का?
जग दुकानासमान का वाटे?
झोपडी तीच....तोच मी आहे!
राजवाड्यासमान का वाटे?
आज अश्रूंस लोचनांमधल्या......
कोंडवाड्यासमान का वाटे?
सोडला हात काय गगनाने?
पंख तुटल्यासमान का वाटे?
............प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY