मी जगाला वाटतो सुग्रास आहे!
मी तुझ्या बागेतला मधुमास आहे!!
एकही ना चेहरा तुझियाप्रमाणे....
का तुझा होतो तरीही भास आहे?
वाटती कावे, दगे निष्पाप मजला....
आजही दुनियेवरी विश्वास आहे!
पांगळेपण पाचवीला पूजलेले....
पण, नभाचा केवढा हव्यास आहे!
खेळतो लाटांसवे अन् कोरडा मी.....
और मी हा घेतला संन्यास आहे!
सारखा घोंगावुनी भंडावतो मज.....
'प्रश्न' आहे की, कुणी हा 'डास' आहे?
सावली माझीच मज गिळते अशी की,
वाटते जैसे ग्रहण खग्रास आहे!
मी जिता आहे तरीही ही पिढी का.....
समजते की, एक मी इतिहास आहे!
सरण मुडद्याला म्हणाले....ऊठ वेड्या.....
या तुझ्या छातीत अजुनी श्वास आहे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY