मी जसा धडपडू लागलो....
जाणवे मी घडू लागलो!
भेट माझी-तुझी जाहली....
मी मला सापडू लागलो!
पार मेल्यावरी ऐकतो.....
त्यांस मी आवडू लागलो!
कोरडी लोचने पाहुनी....
मी स्मशानी रडू लागलो!
ना फिरकले स्मशानी कुणी....
मीच मज सावडू लागलो!
मोल माझे कळू लागले....
कोंदणी मी जडू लागलो!
नाव झाले जरा काय अन्....
मी जगाला अडू लागलो!
शायरी गोड माझी म्हणे.....
मात्र मी तर कडू लागलो!
एवढा चूर स्वप्नात मी....
चालताना पडू लागलो!
राग झाला अनावर तसा....
मी मला हासडू लागलो!
त्या मिठीचा असा गारवा....
चक्क मी काकडू लागलो!
मी बुडालो तुझ्या चिंतनी....
वाटले मी दडू लागलो!
एवढी वाहवाही नको....
मैफिलींना नडू लागलो!
दु:खमिश्रित सुखे लाभली....
मी सुखे पाखडू लागलो!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY