मी जिण्याचा जन्मभर केला किती अभ्यास होता!
मात्र प्रगतीपुस्तकावर फक्त शेरा पास होता!!
यार मी ज्यांना म्हणालो....तेच का गद्दार झाले?
झाकुनी डोळे जणू मी ठेवला विश्वास होता!
लांबुनी प्राध्यापकी पेशा दिसायालाच सोपा.......
रोजचा अभ्यास घरचा त्यात तासंतास होता!
प्रेमवृष्टी जाहली आता सुरू मेल्यावरी मी.....
जन्मभर वाट्यास माझ्या फक्त तो दुसवास होता!
दर्शनी वाटायचे की, मी फुलामध्येच होतो!
मी दिसू नाही दिला जो काय मजला त्रास होता!!
कोण डोंबारी, कुणाच्या मृत्युगोलातील फे-या........
जीवनाचा जीवघेणा एक तो सायास होता!
शेवटाचा श्वास घेताना समजले सत्य मजला.....
तो तुझा माझ्यात वावर...तोच श्वासोच्छ्वास होता!
तृप्त मी झालोच नाही गझल लिहुनी कोणतीही.....
जीवघेणाराच अगदी एक तो हव्यास होता!
जन्मभर कोतेपणाने वगळले त्यांनी भटांना.....
टाळता येणार नाही, तो असा अनुप्रास होता!
याच आनंदामधे मी भोगले आयुष्य सारे.....
जन्म माझा, तू दिलेला एक कारावास होता!
गुंतलो नाही खटाटोपामधे मी कोणत्याही.....
काय जो मज लाभ झाला, तो विनासायास होता!
काटली मी जिंदगी अख्खी तुझ्या त्या कवडशाने....
सोबतीला तो प्रकाशाचा तुझ्या आभास होता!
वाटले दुनियेस की, मढलो किती मी दागिन्यांनी.....
दागिने कुठले, गळ्याच्या भोवताली फास होता!
वाटती माझ्या घबाडासारख्या गझला जगाला....
अर्पिला गझलेस मी एकेक माझा श्वास होता!
फक्त व्याख्यानेच माझी ऐकली मारीत मिटक्या.....
पाहिले नाही कुणी जो घेतला सायास होता!
प्यायला तृष्णा शिकवले, वाळवंटाने जिण्याच्या!
चालते मज ठेवणारा, तो जळाचा भास होता!!
मी ढगांच्या आड गेलो....पण, अरे मी सूर्य होतो!
काजव्यांना वाटले, तो...पूर्ण माझा –हास होता!!
शब्दब्रह्माने दिले साक्षात दर्शन शेवटाला....
पहिला त्याने असावा, काय माझा ध्यास होता!
हे बरे झाले दिली ना मान मी हातात त्यांच्या.....
दागिना नव्हता गळ्याचा, एक तो गळफास होता!
या वसंताहून परवडली अरे ती पानगळही.....
रंग नाही, गंध नाही, तो कसा मधुमास होता?
त्यामुळे डोळ्यावरी आलो....कधी डोळ्यांत भरलो!
शेवटी पटले जगाला...बाज माझा खास होता!!
शेवटी पडल्या थिट्या बघ, मोजपट्ट्या सर्व त्यांच्या.....
काय इतका लांब माझ्या शायरीचा व्यास होता?
का न गुरु-शिष्यासवे फिरणार येणा-या पिढ्या या?
भट व मी... दोघांमधे तो एक सुंदर आस होता!
हिंडलो रानीवनी मी आणि माझी शायरी रे....
राम-सीतेसारखा, नशिबी जणू वनवास होता!
जीवनाच्या ऐन माध्यान्ही गझल मज भेटली अन्....
भरदुपारी चांदण्याचा लाभला सहवास होता!
का फुशारू मी स्तुतीने? का खचू निंदेमुळे मी?
गझल ती नव्हतीच माझी....ईश्वरी निश्वास होता!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY