मी मोहरेन ज्याने तो हा वसंत नाही!
कुठल्याच कोकिळेचे गाणे जिवंत नाही!!
फिरवून तोंड गेला मधुमास ऎनवेळी;
माझ्या प्रतारणेला कुठलाच अंत नाही!
मी सुरकुतू दिले ना केव्हाच चेह-याला;
आरास वेदनांची मजला पसंत नाही!
विसरून लोक गेले, कोणास खंत नाही;
आता रडायलाही कोणी जिवंत नाही!
मी घोळक्यात होतो, अन् एकटाच होतो....
माझ्या मनास कोणी पडले पसंत नाही!
प्रत्येक माणसाच्या हातून चूक होते;
कोणीच संत नाही, कोणी महंत नाही!
झाली बरीच वर्षे निष्पर्ण जाहल्याला;
माझ्या स्मृतींमधेही आता वसंत नाही!
हसलो न मी सुखांनी, रडलो न वेदनांनी;
इतकी मला मिळाली केव्हा उसंत नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY