न यात काही नवल अरे, मी फुटून गेलो, घडाच होतो!
रडायलाही कुणी न मागे, हयातभर मी सडाच होतो!!
अरे, गरीबीमधेच सारे विवस्त्र आयुष्य काटले मी....
अखेर सरणावरी जळाया चितेतही नागवाच होतो!
मला कुणी पाहिलेच नाही, मला कुणी सांधलेच नाही....
कसा कुणाला दिसेन मी? काळजातला मी तडाच होतो!
सरळ कधी कोणतीच झाली न गोष्ट या जिंदगीत माझ्या
सरळ असोनी जगास मी वाटलो सदा वाकडाच होतो!
प्रलोभनांच्या कितीक लाटा मनावरी आदळून गेल्या....
तुषार सुद्धा उडू दिला ना, म्हणून मी कोरडाच होतो!
हवी कशाला प्रमाणपत्रे? हवी कशाला प्रशस्तिपत्रे?
कुणास ठाऊक ना परी मी, तुझ्या गळ्याचा छडाच होतो!
जगात पारायणेच माझी उद्यास होतील खातरी ही....
पिढ्यापिढ्यांनी शिकून घ्यावे मला, असा मी धडाच होतो
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY