नेमके दावतो चेहरा!
आरसा वाटतो चेहरा!!
ध्यास माझ्या मनाला तुझा.....
मी तुझा शोधतो चेहरा!
जीवना! मी निरक्षर कसा?
आज मी वाचतो चेहरा!
खूळ हे काय मी घेतले?
सारखा चाळतो चेहरा!
चलबिचल आतली समजते.....
बोलुनी टाकतो चेहरा!
काय प्रश्नामधे एवढे?
काय ओशाळतो चेहरा!
कोण मी वाटतो त्यास? की,
तो असा लपवतो चेहरा!
काय खाते मनाला तुझ्या?
काय रोडावतो चेहरा!
मीच थट्टाविषय का तुझा?
वाकुल्या दावतो चेहरा!
काय छद्मीपणाला म्हणू?
काय वेडावतो चेहरा!
हौस रंगायची दांडगी!
केवढा रंगतो चेहरा!
पार काळानिळा जाहला....
टोमणे सोसतो चेहरा!
पाहिल्या पाहिल्या भावतो!
चित्त आकर्षतो चेहरा!!
पाहणा-यास तो खिळवतो!
मंत्रही टाकतो चेहरा!!
काय चुकले कळेना मला;
मौन का पाळतो चेहरा?
गुणगुणायास तो लावतो!
चक्क झंकारतो चेहरा!!
रंग चढवायला नवनवे;
रोज खंगाळतो चेहरा!
रोज खातो शिव्याशाप तो;
रोज निर्ढावतो चेहरा!
चेह-याला स्मरे चेहरा!
चित्र रेखाटतो चेहरा!!
फूलही लाजते, शरमते!
और गंधाळतो चेहरा!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY