निर्व्याज कुणाला जगती, का हसता आले नाही?
पाषाण द्रवावा ऐसे, का रडता आले नाही?
मी ब-याच वेळा तुटलो, पण फिरून जुळला गेलो!
मी ताठ कण्याचा होतो...मज झुकता आले नाही!!
जन्माला रानफुलाच्या मी आलो....नशीब माझे!
ताटव्यांप्रमाणे शहरी दरवळता आले नाही!!
मी जगावेगळा वठलो...निष्पर्ण असा झालो की,
मग हयातभर केव्हाही मज फुलता आले नाही!
जग सुद्धा जिंकायाची माझ्यात धमक होती रे!
पण, स्वत:सवे केव्हाही मज लढता आले नाही!!
दरबार चित्रगुप्ताचा मज जाब विचारत होता....
सत्कर्मे बरीच केली...आठवता आले नाही!
शेवटचे काही उरले मोजके श्वास, मज तेव्हा.....
जाणीव हीच झाली की, मज जगता आले नाही!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY