न्यावया येणार मजला हाय, कुठली पालखी?
जो रिता येतो नि जातो, त्यास कसली पालखी?
लेक लाडाची निघाली ज्या क्षणाला सासरी......
त्या क्षणाला हुंदके देऊन रडली पालखी!
भेटला कपडा कसा कोरा मला तिरडीवरी?
नागवा हा जन्म गेला....आज सजली पालखी!
चल, निघू....बोलावले रे, पांडुरंगाने तुला.......
ऐक बाबा, पांडुरंगा! काय वदली पालखी!
लागले वाटेमधे घर साजणीचे माझिया.....
दार होते बंद बघुनी, काय रुसली पालखी!
ने मला मृत्यू अता तू, न्यायचे आहे तसे!
जिंदगीचा भार झाला...फार थकली पालखी!!
हुंदका नाही उसासा, ढाळली ना आसवे.....
मात्र वय झाल्यावरी आतून तुटली पालखी!
मीच खांदा देत आलो रोज नेमाने मला!
प्राण गेल्यावर कळेना... कोण उचली पालखी?
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY