पंख हे मीहून तेव्हा छाटले माझे!
पाहिले आभाळ जेव्हा बाटले माझे!!
वेंधळेपण लावुनी गेले असा धस की,
तत्क्षणी आयुष्य सारे फाटले माझे!
जिंदगीभरची कमाई ओतली माझी....
तेव्हा कुठे हे खोपटे रे, थाटले माझे!
चोरपायांनीच आले, वाचुनी गेले....
ऐकतो की, शेर त्यांनी चाटले माझे!
वेचला एकेक तुकडा काळजाचा मी....
अन् जगाला शेर सारे वाटले माझे!
माझिया खेरीज नाही बदलले कोणी....
रक्त हे नाहक जगास्तव आटले माझे!
या घराला दार नाही, उंबरा नाही....
कोण जाणे काय कोणी लाटले माझे!
काळ गेलेलाच माघारी जणू आला....
हे हृदय तुझिया स्मृतींनी दाटले माझे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY