पंख नाहीत त्यातून मी आंधळा!
लंघतो जो नभा, मी असा पांगळा!!
लक्ष चोहीकडे, दक्ष मी नेहमी!
राहिलो मी न आता खुळा, वेंधळा!!
वाट अडवायला कैक शिखरे उभी.....
मेघ एकूलता एक मी सावळा!
भेट माझी-तुझी पौर्णिमेतील ती.....
तारकाही स्मरू पाहती सोहळा!
प्रीत माझी-तुझी झाक तू अंतरी!
आपल्यातील धागा किती कोवळा!!
मी अनासक्त होऊन मेलो तरी.....
का न पिंडास माझ्या शिवे कावळा?
शेर लक्षात ठेवो न ठेवो कुणी.....
मी न विसरायचा निर्मितीच्या कळा!
सूर्य मी, जो निवू लागलेला अता.....
पाहवेना स्वत:ची मला अवकळा!
बंद खिडक्यांतुनी लोक बघती उन्हे!
पाहिल्या वळचणीने उन्हाच्या झळा!!
द्या कितीही, तरी लोक काही असे......
आवळा देउनी काढती कोहळा!
लोक पिटतात टाळ्या नफा पाहुनी!
काय कैवार हा! काय हा कळवळा!!
सांग टीका न झाली कुणावर जगी?
कोण आहे जगी एवढा सोवळा?
एक तो फक्त होता शहाणा खरा......
जो जगाला अरे, वाटला बावळा!
शीर कोठे मिळाले, कुठे धड पहा......
राहिला फक्त मिळवायचा कोथळा!
ही न ती सारखी कोणती काळजी!
कोण होतो प्रपंचातुनी मोकळा?
हरघडीला लढायास तैनात मी......
जिंदगीच्या लढाईतला मावळा!!
एक ओसाड मी माळरानापरी.....
स्पर्श होता तुझा.... जाहलो मी मळा!
आज येथे, उद्या कोण जाणे कुठे?
एक पांथस्थ मी.....हा बरा ना लळा!
यार तो एक होता कळाले मला.....
कापला केवढ्या हिकमतीने गळा!
वाट कुठलीच निर्धोक नव्हती अरे.....
चौकडे पाहतो रोज मी सापळा!
राख झाली कितीदा, कितीदा उभे......
गाव म्हणते विजांना....भले कोसळा!
मार घण वा हतोडा हवे ते तुला.....
काय पडतो फरक रे कधी कातळा?
वाट बदलून गेले मला पाहुनी......
वाटले नेमके काय त्या वादळा?
केवढा दबदबा, अन् दरारा किती!
कापती लोक त्याच्यापुढे चळचळा!!
याचसाठी मिळाली उपेक्षा मला!
वाटलो मी किती आगळा वेगळा!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY