पारध्याचे मनसुबे उधळून गेले!
नेम चुकले, मात्र शर जवळून गेले!!
मन किती भांबावले, दिपली नजरही....
स्वप्न अधुरे कोणते तरळून गेले?
वाट होती नागमोडी, दूरचीही....
कोण जाणे पाय का हुरळून गेले?
तूच तेवू लागता हृदयात माझ्या....
या मनाचे कोपरे उजळून गेले!
कवडसा तुझिया कृपेचा काय आला....
दुर्विचारांचे धुके वितळून गेले!
घमघमाया लागले का श्वास माझे?
कोणते वारे मला कवळून गेले?
शेर गझलेतील हृदयी थेट शिरले....
अन् सरळ प्राणांमधे मिसळून गेले!
आतला आवाज ऐकायास बघतो...
मन मधे काही तरी बरळून गेले!
संपली मैफील, श्रोते पांगलेही....
शायरी माझीच ते चघळून गेले!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY