प्रेम म्हणजे काय सांगू,
काय असते?
ते जिवांना जोडणारी....
नाळ असते!
माणसाचा देवमाणुस
होत जातो....
नश्वराला ईश्वराचा....
स्पर्श होतो!
चौकडे त्याचाच.....
साक्षात्कार होतो!
या दिठीला एक तो....
दिव्यत्व देतो!!
बाळ कोणाचे असो ते....
बाळ वाटे!
कोणतीही स्त्री असो....
ती माय वाटे!!
ठेचकाळे एक,
कळ, दुस-यास येते!
रक्त सगळ्यांचेच
लालीलाल होते!!
फायदा, तोटा, तुझे-माझे
न उरते!
सर्व काही आपले
होऊन जाते!!
फक्त शरिरे वेगळी....
मन एक होते!
सर्व हृदयांतील स्पंदन...
एक होते!!
स्वप्न जातीने स्वत:
सत्यात येते!
अन् जणू आकाश, धरणी
एक होते!!
रंग प्रेमाचा असा
बहरात येतो...
चौकडे उत्सव फुलांचा
अन् बहरतो!
फूल देता, फूल घेता,
माणसांचे....
ताटवे होतात,
देखावे फुलांचे!
घमघमाया लागते....
माणूसपण मग!
चौकडे लागे फुलाया....
देवपण मग!!
प्रेम पूजा, प्रेम भक्ती....
प्रेम शक्ती!
प्रेम म्हणजे...
त्याग असते,
प्रेम मुक्ती!!
माणसांचे माणसांशी...
एक नाते!
प्रेम असते आतड्याचे...
एक नाते!!
प्रेम जाणावे, करावे,
प्रेम द्यावे!
प्रेम शब्दातून सुद्धा
व्यक्त व्हावे!!
एक दिवसाचाच नाही....
प्रेम उत्सव!
रोज आयुष्यात येवो....
प्रेम उत्सव!!
तोकडे पडतात सारे...
शब्द माझे!
प्रेम म्हणजे काय....
बघ, काळीज माझे!
प्रेम म्हणजे काय.....
बघ, काळीज माझे!
प्रेम म्हणजे काय सांगू,
काय असते?
ते जिवांना जोडणारी....
नाळ असते!
...........प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY