तुझ्याच प्रेमात काय पडलो, कमाल झाली....
वसंत झाला जणू अता बारमास होता!
तुझ्यामुळे जिंदगी सुगंधीत जाहली ही....
हरेक श्वासामधे तुझा तो सुवास होता!आजन्म वेचले मी अश्रूच या जगाचे....
परडीत काळजाच्या सुमनेच आसवांची!
आभाळ या मनाचे दाटून रोज येते...
होते सुरू कधीही बरसात आठवांची!मी असे देऊळ काळोखातले की,
लावल्या कोणी न येथे सांजवाती!
ऊब या हृदयामधे आहेच ऐशी....
सर्व दु:खे येउनी येथे रहाती!हृदय म्हणजे आरसा असतो मनाचा....
प्रतिबिंब एकांतामधे निरखून घ्यावे!
चव प्रत्ययांची समजते अन् भावतेही....
पेल्यास हृदयाच्या सतत विसळून घ्यावे!मला शोधायचे तर शोध एकांतामधे माझ्या....
इथे बाजारबुणग्यांच्या अरे, गर्दीत मी नाही!
मला मोजायला चालायची ना ही खुजी पट्टी....
कुणाच्या बेरजेमध्ये, वजाबाकीत मी नाही!तू अंबरी मनाच्या पळभर लकाकली.....
निमिषात त्याच तुजला निरखून पाहिले!
तू एक भेटवस्तू होती दिली मला.....
ते चक्क हृदय होते, उघडून पाहिले!घराच्या बंद दाराने तुझ्या, हाका दिल्या होत्या....
घराबाहेर ते माझे कलेवर थांबले होते!
उभे आयुष्यही पडले थिटे मज शोधण्या उत्तर...
कटाक्षानेच तू कोडे गुलाबी घातले होते!मी गळ्यामध्ये कुणाच्याही न पडलो...
जाहली दु:खे, कधी सौख्ये फरारी!
पैलतीराचे कितीसे शेष अंतर?
मी अता करतो निघायाची तयारी!कोण जाणे, कोण नेतो चोरुनी सारीच किरणे?
सूर्य आकाशात आहे, अन् इथे अंधार आहे!
आज बाजारात चालू लागली नकलीच नाणी.....
ऐट नाण्याची अशी की, ते जणू कलदार आहे!हरेक माणसास आपलेच कर....
हरेक माणसाकडे हसून बघ!
अलौकिकास चाख एकदा तरी.....
स्वत:स सार दूर अन् जगून बघ!न मी जळालो, असेल ते एक स्वप्न माझे....
पहा निघू लागला गुलाबीच धूर आहे!
खुलेच डोळे कलेवराचे अजून सुद्धा....
सखीस भेटायला किती हा सबूर आहे!कोठुनी येतात ओठी दिव्य ओळी?
रोज देवाशीच वार्तालाप आहे!
डौल, ठेका, लय कशी गझलेत येते?
मी मृदंगाची उराच्या थाप आहे!खूप झाले युद्ध माझ्याशीच माझे आजवर...
आज केली मीच माझ्याशी तहाची बोलणी!
सर्व दुख-या वेदना अन् सौख्य केले वेगळे....
ही अशी केली अखेरी मी मनाची फाळणी!हातात रस्त्याच्याच मी आहे दिलेला हात हा....
रस्ताच उरला सोबती जो चालतो माझ्यासवे!
ओढीत हे वार्धक्य माझे सांग धावावे किती?
तू धाव मृत्यू, आज माझ्याने न साधे चालवे!नागमोडी वाट प्रामाणीक वाटे....
सरळ रस्ता मात्र धोकेबाज आहे!
राग कोणाचाच मजला येत नाही....
मीच माझ्यावर अता नाराज आहे!वेंधळेपण लावुनी गेले असा धस की,
तत्क्षणी आयुष्य सारे फाटले माझे!
जिंदगीभरची कमाई ओतली माझी....
तेव्हा कुठे हे खोपटे रे, थाटले माझे!मनापासून मी अध्यापनाचे व्रत कडक केले....
कधीही नोकरीला मी म्हणालो नोकरी नाही!
दिला जो शब्द माझ्या जिंदगीला तो खरा केला.....
कधी मी हुंदका येऊ दिला ओठांवरी नाही!मी बरा अन् शायरी माझी बरे दोघेच आम्ही....
घेतला कोणाकडोनी विकत मी सन्मान नाही!
लांबचा असला तरीही सरळ रस्ता चालतो मी.....
आडवाटांशी कधीही बांधले संधान नाही!इतका कसा अचानक गंधाळलो असा मी?
मज समजलेच नाही, जवळून कोण गेले!
एकांत फक्त होता तो सोबतीस माझ्या.....
मज वाटते असे का? कवळून कोण गेले!उपेक्षाच गझलांची माझ्या असे अपेक्षित....
मी कोणाच्या दारोदारी फिरलो केव्हा?
आज तुझ्या ओठांवर आल्या गझला माझ्या.....
केव्हा तू गातेस मला मी सुचलो केव्हा?मान्य की, गलबत बुडाले, पण अरे, कोठे बुडाले?
ते समुद्री खोल, तरले मात्र काठावर बुडाले!
वाहुनी रस्ताच गेला, बांधता येईलही.....
कोठुनी येणार मैलांचेच जे पत्थर बुडाले!राहते तारुण्य वार्धक्यातही....
अंतरंगी फक्त हिरवळ पाहिजे!
फूल कुठले सांग अत्तर लावते?
काळजामध्येच दरवळ पाहिजे!ना कुणी हेलावले ना ढाळले अश्रू कुणी.....
सोडला मी प्राण तेव्हा गगन हे आरक्त होते!
शेवटाचा श्वास सरणानेच घेताना कुणीही.....
सोयरे नव्हते उपस्थित, यार माझे फक्त होते!मज सीलबंद केले जैसा कुणी लिफाफा!
कळलेच पण जगाला मी एक सोनचाफा!!
प्रत्येक शेर माझा फुलतो मळ्याप्रमाणे!
माझा हरेक मिसरा गझलेमधील वाफा!!फुलेच गोळा करीत बसले...तोच लागला नाद जणू!
काटे बसले रुतून हृदयी....झाले क्षण बरबाद जणू!!- प्रपंच करता करता केव्हा तोलच ढळला कळेच ना....
एक गुलाबी प्रमाद करुनी प्रेमाला मोताद जणू!
- प्रपंच करता करता केव्हा तोलच ढळला कळेच ना....
- घाव किती शब्दांनी केले शब्दच नाही वर्णाया....
असे लागले वाटू की, हा आयुष्याशी वाद जणू!
- घाव किती शब्दांनी केले शब्दच नाही वर्णाया....
इतके सात्विक भांडण नाही शोभत वेडे प्रेमामध्ये!
दोघांच्याही काळजावरी, गडद लालसर, तो चरा हवा!!
कुठे मागतो, तुझ्या मनाचा महाल सखये, रहायला मी?
जरा टेकण्यासाठी तुझिया हृदयाचा मज, कोपरा हवा!श्वास होते तेवढे जगलो...इथे तेजाळलो!
कैक पणत्या लावुनी मी शेवटी अंधारलो!!खुद्द नभाची ही मर्जी जर, हरकत नाही!
नकोस देऊ पंख हवे तर, हरकत नाही!!
तुझा भासही पुरे माझिया तृष्णेसाठी......
मृगजळही प्राशेन जन्मभर, हरकत नाही!ओठ टाचुनी बसलो होतो!
नजर तिची मी चुकवत होतो!
बघून मज ती हासत होती....
नजर चहाडी लावत होती!!कडाक्यात थंडीच्या जैसे ऊन्ह पडावे....
तुझी आठवण येताना तू स्वत:च यावे!
कुडकुडणा-या जिवास थोडी ऊब मिळावी.....
नजरेला उबदार तुझ्या ही नजर भिडावी!!मरणाचाही उत्सव झाला जर असता तर.....
नाचनाचले असते माझे हेच कलेवर!रुसव्याफुगव्या विना प्रेम हे अगदी अळणी अळणी असते!
लसणाची फोडणी जशी, वरणालाही वर जरुरी असते!!शायर जेव्हा माणसास माणुसपण देतो!
ईश्वर त्याच्या लेखणीस मग वाणी देतो!
लावुनी शून्यात दृष्टी ती उभी होती......
काय त्या डोळ्यांत उघड्या झाकले होते?
फुले वेचताना उभी ओणवी ती......
जणू वाटते वाकलेली डहाळी!
................प्रा.सतीश देवपूरकर
LEAVE A REPLY