Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

प्रा.सतीश देवपूरकर

 
  • दूर....अगदी दूर...अंतर पाहुनी भ्यालो जरी;
    हे न थोडे की, सतत मी काटला रस्ता तरी!
    श्वास टाकायास थोडा थांबलो वाटेमधे.....
    तोच माझे गाव आले खुद्द, चालत सत्वरी!!

     

  • माणसे जर पुस्तके झाली खरोखर!
    रोज आवृत्ती नवी आली खरोखर!
    केवढी होईल ही दुनिया सुरीली.....
    माणसांची जर गझल झाली खरोखर!!

     

  • पावले त्याची कळेना, त्यास कोठे नेत होती?
    कोणती आकाशगंगा त्यास हाका देत होती?
    तो नव्हे, तो सूर्य गेला, सूर्यमालेतून जैसा......
    खुद्द ब्रह्माचीच त्याला साद ऐकू येत होती!

     

  • कोण काय बोलतो? कोण काय झाकतो?
    तो वरून ऐकतो...तो वरून पाहतो!
    कोण वाहतो फुले, कोण वाहतो शिव्या?
    माणसास तो अरे, आरपार वाचतो!!

     

  • मी भटांनी पेरलेल्या शायरीचे बीज आहे!
    मी पिढ्यांसाठीच केलेली अशी तजवीज आहे!
    अंतरी माझ्या भटांचे एक अग्नीहोत्र चालू......
    गझल माझी त्यामुळे साक्षात झाली वीज आहे!!

     

  • लागला कोणास माझा ठाव आहे?
    दागिन्यांना केवढा या भाव आहे?
    काळजाला एक आहे चोरकप्पा.....
    मी जिथे एकेक जपला घाव आहे!

     

  • आठवणींना स्थळकाळाचे कुठले बंधन?
    तरुण मनाला वार्धक्याचे कुठले बंधन?
    जे जे सुंदर असते त्यातच रमते मन हे......
    सुंदर शब्दांना झरण्याचे कुठले बंधन?

     

  • प्रेमासाठी स्थळकाळाचे कुठले बंधन?
    रेशिमगाठीतल्या पिळाचे कुठले बंधन?
    काय करावे, करू नये ते भान कशाचे.....
    मुक्त मनांना व्यवहाराचे कुठले बंधन?

     

  • आसन्नमरण माणसास हे ती काय देउनी गेली?
    संजीवन, सरणावर माझ्या, साक्षात शिंपुनी गेली!
    तहहयात प्रेमाच्या अग्नीमधे जळत जो बसलेला....
    निखा-यास निवणा-या माझ्या, का हवा देउनी गेली?

     

  • वाट कोणी देत नसतो, वाट व्हावे लागते!
    गाठण्यासाठी किनारा लाट व्हावे लागते!
    चोरवाटा, आडवाटा लोपती वाटेमधे,
    गाठ शिखरांशी पडाया घाट व्हावे लागते!!

 

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ