पुन्हा ती दांडगाई, झुंडशाही, त्या विचारांची!
पुन्हा झाली सुरू दंगल, मनी माझ्या विचारांची!!
भले आहेस तू चंद्राप्रमाणे पौर्णिमेच्या पण........
झळाळे लख्ख भवताली, अमावस्या विचारांची!
अता तूही जरासे झोप, बाकीचे उद्या गाऊ........
अताशा झोपली आहे गझल, तान्ह्या विचारांची!
मनाचा डोह पाण्यानेच गोड्या गच्च भरलेला.........
कळेना, लाट आली कोठुनी, खा-या विचारांची?
मनाचे खेळ हे सारे.....नको लागूस तू नादी......
करू या चक्क होळी चल अता, सा-या विचारांची!
झळा येतील त्या सोसायला तू शीक निष्ठेने.........
अरे, ही आग आहे, आग ही....ताज्या विचारांची!
लगडली केवढी माझ्या, फळे चवदार, झाडाला.........
बिजे मी पेरली होती तशी, साध्या विचारांची!
चपापू लागले सारेच शायर ऐकताना बघ.........
गझल मी लागलो गाऊ नव्या, ताज्या विचारांची!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY