रक्तामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!
देहामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!!
जे वारले ते मूल होते.....ते कुणाचेही असो.....
नात्यामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!
हृदयातले ठोके कुणाचे, वेगळे पडतात का?
श्वासामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!
गीतेतली शिकवण असो, शिकवण कुराणातील वा.....
अर्थामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!
द्या नाव तुम्ही वेगळे त्यांच्या प्रथांनाही भले......
बोधामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!
डोळ्यांमधे येतात अश्रू ते कुठे का वेगळे?
शल्यामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!
खुदकन हसू फुटते कुणा, पावित्र्य त्याचे एकसे.....
हसण्यामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!
तो राम वा अल्ला असो, तो शेवटी आहे खुदा!
देवामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!!
ती ईद आहे की, दिवाळी, सारखा आनंद तो......
त्याच्यामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!
हे धर्म नावाने निराळे निर्मिले कोणी अरे?
मूळामधे कोठे फरक? हिंदू असो, मुस्लिम असो!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY