रंगांच्या भाषेत बोलतो, चित्रकार मी!
काळजातले भाव प्रकटतो, चित्रकार मी!!
पालटणारे रंग पाहतो चेह-यांतले......
रंगांवरुनी हृदय वाचतो, चित्रकार मी!
दुनिया म्हणजे व्यंगचित्र वाटते अताशा.....
अव्यंगांचे व्यंग पाहतो, चित्रकार मी!
तुझी सावली असते, जेव्हा कुणीच नसते......
तुझेच तेव्हा चित्र काढतो, चित्रकार मी!
नकोस बोलू काही, मजला कळते सारे......
डोळ्यांमधले रंग वाचतो, चित्रकार मी!
नजरेचा कुंचला, रंग अन् माणुसकीचे.......
पार्थिवात दिव्यत्व शोधतो, चित्रकार मी!
सुरकुतलेला वृद्ध चेहरा जेव्हा बघतो.......
सुरकुत्यांतले ऋतू रेखतो, चित्रकार मी!
परमेशाच्या हातामधला टिपकागद मी.......
चराचराचे रंग शोषतो, चित्रकार मी!
नखशिखांत सौंदर्य पाहतो जेव्हा कोठे.....
डोळे भरुनी तुलाच बघतो, चित्रकार मी!
डोळ्यांचे हे धनुष्य, नजरेची प्रत्यंचा.......
चित्रांमधुनी नेम साधतो, चित्रकार मी!
विश्वच अवघे चित्र जणू हे तुझे विधात्या!
तुझा कुंचला हाती धरतो, चित्रकार मी!!
जग हे सुंदर करण्यासाठी खटाटोप हा.....
चित्रामध्ये तुला आणतो, चित्रकार मी!
तहान माझी दिव्यत्वाच्या रंगांची ही.......
तुला शोधण्याला वणवणतो, चित्रकार मी!
तुझ्यापासुनी दूर.....दुरावा सोसत नाही!
कुंचला तुझ्यास्तव हा झुरतो, चित्रकार मी!
तसा मूक मी, बोलायाचे समजत नाही!
रेषांमधुनी मन उलगडतो, चित्रकार मी!!
प्रत्येकाच्या चेह-यात मी तुलाच बघतो!
कलाकृती ही तुझी निरखतो, चित्रकार मी!!
मिश्रण करतो रंगांचे मी तुझ्याचसाठी!
छटा तुझी खेचून आणतो, चित्रकार मी!!
काय काढतो चित्र, जगाला कळते कोठे?
तुझीच मर्जी मी पोचवतो, चित्रकार मी!
एक एक पैलू मज कळतो तुझा अखेरी!
त्या पैलूंचे चित्र काढतो, चित्रकार मी!!
रंगांच्या माध्यमातुनी मज भेटत जा तू......
कैक जन्म मी हेच मागतो, चित्रकार मी!
तू असल्याने जिवंत होती चित्रे माझी!
जो तो माझी तारिफ करतो.....चित्रकार मी!
निराकार तू, अमूर्त तू या दुनियेसाठी......
मूर्तिमंत मी तुला पाहतो, चित्रकार मी!
कवी न मी, शायर ना मी, ना शब्दप्रभू मी!
चित्रामधुनी तुला पूजतो, चित्रकार मी!
जन्मोजन्मीची पुण्याई असेल माझी......
तुझी कृपा असल्याने बनतो, चित्रकार मी!
हाच मारवा, हीच भैरवी आहे माझी......
कुंचल्यातुनी तुज आळवतो, चित्रकार मी!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY