रविकिरणांच्या दिंडीमधला वारकरी मी!
सूर्य पाहिला अंधाराच्या घरोघरी मी!!
पाय मला मातीचे होते....साफ विसरलो!
उगाच केली आकाशाशी बरोबरी मी!!
हृदयी माझ्या धडधड धरणीच्या हृदयाची;
मेघांनी हे ओळखले की, शेतकरी मी!
मन अन् बुद्धी...टाळ जाहले, तुझिया भजनी;
तुझा भक्त मी! तुझा पुजारी! टाळकरी मी!!
घाम गाळतो, कष्टाची मी भाकर खातो!
कष्ट कराया कशास लाजू?....कष्टकरी मी!!
जिथून जे जे, मिळते ते ते, अजून शिकतो!
गझलेच्या या क्षेत्रामधला शाळकरी मी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY