रोज कंबर कसत गेलो, जगत गेलो!
दगड होतो, एक लेणे बनत गेलो!!
लोक म्हणती शायरीने मी बिघडलो....
शायरीने मी खरे तर घडत गेलो!
कोणता चालू ऋतू माहीत नाही.....
मात्र मी आतून माझ्या फुलत गेलो!
पाहिले अस्मान जेव्हा बाटलेले.....
मीहुनी त्याच्यातुनी मग कटत गेलो!
नाटक्यांचा त्रास आता होत नाही....
नाटके दुरुनीच त्यांची बघत गेलो!
रोज जगण्याशी लढाई चाललेली....
रोज जगण्यास्तव अरे, मी मरत गेलो!
मज खुणावू लागली क्षितिजे अशी की,
त्या दिशांना रोज मीही वळत गेलो!
मन तरुण पण, वय तनूचे जाहलेले.....
मी पुढे गेलो परंतू बसत गेलो!
सांत्वनांची कोरडी भिक्षा मिळाली.....
मी उगा त्यांच्याकडे रे, कण्हत गेलो!
एवढे डोळ्यात अश्रू साचले की,
आड कफनाच्याच मी रे, रडत गेलो!
मी रुचायाला, पचायाला न सोपा....
पण, जगाला शेवटी मी पटत गेलो!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY