समुद्राला नदी म्हणते......तुझी मी व्हायला आले!
अरे, सर्वस्व मी माझे, तुला अर्पायला आले!!
समुद्राला नदी म्हणते .......//ध्रु//
तुला कळणारही नाही, किती लांबून मी आले!
कपा-या, अन् कडे, सुळके, किती लंघून मी आले!
किती ते अडथळे होते, किती मी घेतले वळसे.....
किती कापून मी उंची, तुला भेटायला आले!
समुद्राला नदी म्हणते.....तुझी मी व्हायला आले!! //१//
तिथे उत्तुंग शिखरांवर, किती मी गोठले होते!
अशा उंचीवरी होते, जिथे मी एकटी होते!
कुणी ऐकायला नव्हते....कुणी बोलायला नव्हते......
उरी जे दडपले होते, तुला सांगायला आले!
समुद्राला नदी म्हणते.....तुझी मी व्हायला आले!! //२//
ढगांचे कोरडे सारे जथे माथ्यावरी होते!
हवेचे वादळी थैमान माझ्या भोवती होते!
विजांच्या लखलखाटाने, ढगांच्या गडगडाटाने.....
बिचकले, दचकले हृदयी किती....सांगायला आले!
समुद्राला नदी म्हणते.....तुझी मी व्हायला आले!! //३//
किती दुष्काळ पेलावे.....किती वर्षाव झेलावे!
कितीदा ढगफुटींचे मी अकस्मिक वार सोसावे!
तडकले उंच पर्वतही, कडेही कैक कोसळले......
उरी सामावले सारे, तुला ते द्यायला आले!
समुद्राला नदी म्हणते.....तुझी मी व्हायला आले!! //४//
किती जोमात मी होते! किती त्वेषात मी होते!
किती उंचीवरोनी मी स्वत:ला झोकले होते!
जसे वय वाढले माझे, तशी मी शांतही झाले.....
तरी ओढीत पायांना, तुला भेटायला आले!
समुद्राला नदी म्हणते....तुझी मी व्हायला आले!! //५//
किती जलजन्य खडकांना दिला मी जन्म मायेने!
तळी कित्येक मी भरली शिगोशिग या प्रवाहाने!
किती गावे, किती वाड्या, किती वस्त्यांतुनी आले......
मिळाले काय जे वाटेत ते तुज द्यायला आले!
समुद्राला नदी म्हणते....तुझी मी व्हायला आले!! //६//
उसासे, हुंदके, टाहो, जगाचे ऐकुनी आले!
धरेने ढाळलेले सर्व अश्रू वेचुनी आले!
जगाला अन् स्वत:लाही दिलासे देउनी आले.....
उरी या साठलेले सर्व मी तुज द्यायला आले!
समुद्राला नदी म्हणते...तुझी मी व्हायला आले!! //७//
किती विस्तीर्ण मी झाले! किती शालीन मी झाले!
किती अपघात अन् धक्के, उरी झेलून मी आले!
खळाळत मी जरी नाही, तरी मी वाहते आहे.....
कमाई, सर्व पुण्याई तुला अर्पायला आले!
समुद्राला नदी म्हणते....तुझी मी व्हायला आले!! //८//
दुरावा आजवर मी सोसला अगदी धिटाईने!
तुझ्यासाठीच मी मजला, तगवले रे, शिताफीने!
तुझ्यावाचून रे, आहे अधूरी एक सरिता मी.....
तुझ्यामध्ये विराया, एक आता व्हायला आले!
समुद्राला नदी म्हणते.....तुझी मी व्हायला आले!
अरे, सर्वस्व मी माझे, तुला अर्पायला आले!! //९//
-------प्रा. सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY