सरत आलेत गात्रातील माझ्या त्राण हे!
तुझ्यासाठीच खोळांबून बसले प्राण हे!! //ध्रु//
तुझ्या वाटेकडे डोळे कधीचे लागले!
उभ्या जन्मात डोळ्यांना न डोळे लागले!
कधीचे दार हृदयाचे खुले मी ठेवले....
सतत ते फक्त वा-यानेच वाजत राहिले!
तुटायालाच मी आलो, न सोसत ताण हे!
सरत आलेत गात्रातील माझ्या त्राण हे!! //१//
तुझ्या यज्ञास श्वासांच्याच समिधा वाहतो!
अहोरात्रीस अग्नीहोत्र चालू ठेवतो!
विकारांच्या असूरांशी सतत मी झुंजतो....
जिण्याचे व्रत कसोशीनेच चालू ठेवतो!
व्रताच्या सांगतेचे त्या सजवले वाण हे!
सरत आलेत गात्रातील माझ्या त्राण हे!! //२//
तुझी पूजा, तुझा जप, आरती करतो तुझी!
सतत मी वागतो आहे जशी मर्जी तुझी!
तुझ्या-माझ्यात आता भेद उरलेला कुठे?
मला कळते तनू माझी परी वस्ती तुझी!
तरी तुज पाहण्यासाठी तरसती प्राण हे!
सरत आलेत गात्रातील माझ्या त्राण हे!! //३//
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY