सावलीखेरीज माझ्या फक्त येथे मीच आहे!
या सुन्या रस्त्यात गर्दी, केवढी माझीच आहे!!
वाटले मी प्रेम ज्यांना, ते मला सोडून गेले.....
होय! मी केला गुन्हा हा! ही सजा त्याचीच आहे!
शांत मी आहे कसा? वाटे मला आश्चर्य माझे!
माझिया गात्रांत नुसती वेदनांची कीच आहे!!
ज्ञान मी छत्तीस वर्षे देत विद्यार्थ्यांस आलो;
ज्ञान हे नुसतेच नाही....चक्क गुरुकिल्लीच आहे!
जिंदगी नुसती नव्हे, मनही तुझ्या केले हवाली!
माझिया हातात आता फक्त ती भक्तीच आहे!!
रंगते जगणे, जसे ते तोंड रंगावे विड्याने!
हे हृदय सद्भावनांची आगळी चंचीच आहे!
मी मला ‘आम्ही’ असे संबोधतो ते याचसाठी
हरघडीला देव असतो सोबती! खात्रीच आहे!
देशसेवा, देशभक्ती, वल्गना अन् घोषणा या.....
आज जो तो लावतो आपापली वर्णीच आहे!
माणसांची ओस पडलेली मला दिसतात हृदये!
जा कधीही तीर्थक्षेत्रांना, तिथे गर्दीच आहे!!
लोक ते मजला खणाया लागले खाणीप्रमाणे!
एवढे कळते.....जगाची चांगली चांदीच आहे!!
झुंज अतिरेक्यांसवे देती किती निधडेपणाने!
कवच नाही, कुंडले ना, पोलिसी वर्दीच आहे!!
भिरभिरे मतल्यातुनी मक्त्यात हे काळीज माझे!
मी अशी गझले! जणू करतो तुझी वारीच आहे!!
मोकळ्या केसांत तुझिया, हे हृदय गुंतू पहाते!
तो तुझा गजरा फुलांचा खोडकर भारीच आहे!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY