Swargvibha
Dr. Srimati Tara Singh
Administrator

शहाणपण आले अडल्यावर!

 

शहाणपण आले अडल्यावर!
सुधारलो पण, धडपडल्यावर!!

 

काटकसर मी करू लागलो.....
खिसेच सारे खडखडल्यावर!

 

उतरलीच रग तारुण्याची......
उतार वय हे खडखडल्यावर!

 

अशी तरतरी, ऊर्मी येते.......
तापामधुनी खडखडल्यावर!

 

काम मनापासून करावे.....
काम मनाला आवडल्यावर!

 

बोलघेवडेपणाच नडतो.......
कळते हे पण, बडबडल्यावर!

 

नकार देतो सहा असे मी.......
फारच कोणी कडकडल्यावर!
(सहा नकार असे आहेत: मौन, विलंबन, भ्रूभंग, अधोवदन, गमन व विषयांतर)

 

षटीसहामासी हे घडते.......
पारा चढतो कडकडल्यावर!

 

फुंकरून मी ताक पितो पण.....
पाउल चुकते गडबडल्यावर!

 

सौजन्याने हात टेकले.....
काम जाहले हासडल्यावर!

 

पाऊस काय दरवेळी येतो?
गगन जरासे गडगडल्यावर!

 

का न स्वप्न तडकावे माझे?
दुनिया इतकी चडफडल्यावर!

 

सुतासारखे सरळ जाहले;
लोक, परंतू झडझडल्यावर!

 

खुशाल दे फोडणी परंतू......
तेल, मोहरी तडतडल्यावर!

 

लटपटले वासे अन् वळचण.......
खुद्द चौथरा धडधडल्यावर!

 

लोक प्राण गेल्यावर आले......
हाक मारली तडफडल्यावर!

 

चण पूर्वीची परत मिळाली......
मेद मनाचा सडसडल्यावर!

 

धडधाकट पण, धडकी भरते.......
तुझ्या स्मृतींनी धडधडल्यावर!

 

प्रसन्नता, शांतता मिळाली......
मनास माझ्या खरवडल्यावर!

 

सोयरीक आताशा जमते........
पगारपाणी परवडल्यावर!

 

वय मोठे पण, मुले अरे, ती.......
शांत जाहली हुंदडल्यावर!

 

सगेसोयरे निघू लागले......
प्रेत जरासे भडभडल्यावर!

 

रडकुंडीला आलो होतो......
बरे वाटले रडरडल्यावर!

 

काळजात दिसतील तुम्हाला....
व्रण जे होती वरखडल्यावर!

 

तेच पान स्मरंणांचे उघडे......
काळिज माझे फडफडल्यावर!

 

गझला माझ्या गुलाबपाणी.......
घमघमती ज्या शिंपडल्यावर!

 

 

-------प्रा.सतीश देवपूरकर

 

Powered by Froala Editor

LEAVE A REPLY
हर उत्सव के अवसर पर उपयुक्त रचनाएँ