शिकवते पानगळ....कैसे फुलावे!
शिकवती आसवे.....कैसे हसावे!!
तुझे अश्रू अरे, मोत्यांप्रमाणे......
उगा मातीत त्यांनी का झरावे?
कुणी पुसणार जर नाहीत डोळे.....
कशाला लोचनांनी या रडावे?
म्हणोनी गात अंगाईच निजतो......
सवे माझ्याच, दु:खांनी निजावे!
मला माझा बहरही सोसवेना......
मला कोणी तरी आता खुडावे!
रिचवले तू दिलेले सर्व प्याले......
बघू, आता तरी, विष ते भिनावे!
अता एकांतही मैफील होतो......
तुझ्या स्वप्नांमुळे रंगत दुणावे!
कितीदा वादळे सोसायची मी?
अता पानापरी पिकल्या गळावे!
कुणाची का अपेक्षा ठेवशी तू?
स्वत: थडगे स्वत:चे रे, खणावे!
गझल माझी अहोरात्रीच चाले!
भटांचा शुक्रतारा तो खुणावे!!
-------प्रा. सतीश देवपूरकर
Powered by Froala Editor
LEAVE A REPLY